गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

प्रिय मैत्रिणीस...

आठवतंय? याच झाडाखाली
भातुकलीचा डाव मांडायचो आपण
फांद्यांवर चढून आणि लपंडाव खेळायचो आपण

भांडणं झाली की, ढसाढसा रडायचो
पडलो, धडपडलो तरी उठून उभं रहायचो
अंगावरची धूळ झटकत खदाखदा हसायचो

फादीवरच्या चिऊकाऊंना
आपली सवय होऊन जायची
घरट्यामध्ये त्यांची पिलंही
आपल्यासारखीच बागडायची

ऊन चढल्या दुपारी हाच वृक्षराज
तुझ्यामाझ्यावर सावली धरायचा
गवताला कुरवाळणा-या फांद्यांनी
जमिनीशी गप्पा मारायचा

ऊन्हं उतरताना त्याचा
निरोप घ्यायचो आपण
घर मागंच ठेवून
घराकडं परतायचो आपण

कधी कोजागिरीच्या दूधात
त्याचंही प्रतिबिंब पडायचं
आपण शेकोटीभोवती नाचताना
त्याचंह अंग थरथरायचं

पावसात आपण खिडकीत
धडे गिरवत बसायचो
बाहेर भिजणा-या त्याच्याकडे
मत्सरानं पहायचो

वर्ष उलटून गेली, पाखऱं उडून गेली
पिढ्या-पिढ्यांना आधार देत तो उभाच राहिला
तुझ्या-माझ्या बोलांचाही पाचोळा तेवढा उरला

आजही ऊन पडतं,
आजही पाऊस पडतो
थरथरता हिवाळा संपला की, वसंत जागा होतो

झाडाखाली जाताना पण
जीव आता घाबरा होतो
तुझी आठवण येते
आणि श्वासच अधुरा होतो...

- जान्हवी

0 टिप्पणी(ण्या):