गुरुवार, ३० ऑगस्ट, २००७

हे गीत कसे मग म्हणू मी माझे?

शब्द तुझे अन् सूरही तुझे,
हे गीत कसे मग म्हणू मी माझे?

शब्द माझ्या मुखी उमटता,
साकारणारे संगीतही तुझे,
हे गीत कसे मग म्हणू मी माझे?

दोन घडींचा जन्म दिधला,
तुझ्या दर्शना जीव आधीरला,
शब्द सांगती शाईची माया
देहास लाभे लेखणीची काया,
मन कागदावर उतरवणारे,
ते अफाट हात तुझे,
हे गीत कसे मग म्हणू मी माझे?

भाव भक्तीचा नितळ जलाशय
जीव त्यातच बुडून गेला
समरसतेचा तरंग उमटता
डोकावून कोणी पाहते,
तरळणारे बिंब तुझे,
हे गीत कसे मग म्हणू मी माझे?

सागराची गहन गर्जना,
आडामधली खोल शांतता,
बरसणारे औदार्य नभांचे,
आणि फेसाळते हास्य झ-यांचे
बेभान नदीची धुंद मुक्तता
किंवा तळ्यातली नीरव शांतता
कळूनही कुणा न कळणारे
निराकारसे रूप तुझे,
हे गीत कसे मग म्हणू मी माझे?

पाण्यामधून खळखळणारे अन वा-यावरती भिरभिरणारे
कणाकणात ओथंबून अणू-रेणूंना भारणारे
संगीताच्या स्पर्शानं हृदयी माझ्या स्पंदणारे
केवळ नाम तुझे
हे गीत कसे मग म्हणू मी माझे?

- जान्हवी
...................................................................................................................................
© All Rights to this and all poems published in this Blog are reserved. Reproduction of any kind without prior permission of the Wirter is not allowed.