बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०

अवकाळी पाऊस.. आठवणींचा

पाऊस...
आजकाल कधीही येतो.
तुझ्या आठवणींसारखा भरून वाहतो..

अचानक विजा चमकतात तेव्हा
दिसतात काही धूसर प्रतिमा...
आणि वारा घेऊन येतो गंध कुठूनसा.

तेव्हा मी डोळे मिटून घेते.
कारण माझ्या आत आजही
तीच जुनी मी राहते.

एक श्वास अडखळतो..
एक शब्द अडकतो..
आतल्या आत माझा जीव तुलाच शोधत राहतो...

डोळे उघडतात तेव्हा
जग नव्याने कळते.
तुझी आठवण येते आणि मी स्वतःशीच हसते..

शनिवार, ९ जानेवारी, २०१०

ऋतू बदलेल

काही गोष्टी अशा पटकन थोडीच संपतात?

नवी फुलं अशी लगेच कुठे उमलतात?

ऋतू बदलण्याची वाट पहावीच लागते

मला खात्री आहे

पुन्हा वसंत फुलेल, नवी पालवी फुटेल

ती बाग कदाचित हीच असणार नाही

तो माळीही दुसरा असेल

पण मी इथंच राहीन

वाट पहात

त्या अजाण अनाकलनीय भविष्याची,

जे उद्या माझं वर्तमान असेल..

मी वाट पहात राहीन

मला खात्री आहे

वठलेल्या झाडालाही नवे धुमारे फुटतील


- जान्हवी