सोमवार, ९ जुलै, २००७

स्त्री तुझं जगणं...

स्त्री तुझं जगणं...
तापत्या आकाशात तळपत राहणं...
कधी मेणबत्तीसारखं वितळणं,
कधी उदबत्ती बनून दरवळणं

स्त्री तुझा थाट

जसा विजेचा थयथयाट, कधी उल्केचा झगमगाट
किंवा कधी भरदुपारी, उजाड अंगणात सूर्याचा जळफळाट
तर कधी निशब्द अंधार भेदणारा ता-यांचा लखलखाट

कधी देवापुढे तेवणारी एक मिणमिणती पणती
कधी घर पेटवणारी लुटारूंची दिवटी
किंवा कधी बघ्यांना रिझवणारी डोंबा-यांची अगीनकडी

स्त्री तुझं जगणं
जळणं, जाळणं, जळवणं...

गवतासारखं पेट घेणं, वणव्यासारखं पेटवत जाणं...
कधी कोळशासारखं निखारा बनून राखेखाली धुमसणं
कधी रापलेल्या गोवरीसारखं
कण्हणं, कुढणं, जळणं, जळणं, जाळणं, जळवणं...

स्त्री तुझं जगणं
म्हणजे ज्योतीसारखं हेलकावणं...
वा-याच्या झुळुकेवर थिरकणं आणि बेधुंद वादळातही फरफरणं


स्त्री तुझं जगणं
कधी कापरासारखं भुरभुरणं, कधी कापसासारखं हुळहुळणं...
स्त्री तुझं जगणं...

कधी धुमसत्या रणांगणात तोफा-बंदुकांचं बरसणं
कधी फटाक्यांच्या लडीचं मिरवणुकीत तडतडणं...


स्त्री तुझा भास
अग्निच्या साक्षीनं ठेवलेला विश्वास
धूप, होम- हवनात कोंडणारा श्वास
आणि घराबाहेर पडताना सोडलेला निश्वास...


स्त्री तुझा ध्यास
लेकराच्या पोटासाठी चिमुकला घास
कधी चुलीची धग आणि भाकरीचा वास
तर कधी निवणा-या शेकोटीची ऊब
आणि वाढत्या गारठ्याचा त्रास


स्त्री तुझा आधार
सळसळत्या उर्जेचा साक्षात्कार
सावलीतही जाणवणारा उन्हाचा प्रहार
मनामनात पेटलेला एक कोवळा अंगार...


स्त्री तुझं मन
जसं वाळवंटातलं जळजळतं रण
ज्वालामुखीतून बाहेर येणारं पृथ्वीचं आक्रंदन


स्त्री तुझं जीवन
एका आगीचं जगणं
ठिणगी बनून उडणं आणि अस्तित्वाशीच लढणं


स्त्री, तुझं जगणं
नियतीचं लाडकं खेळणं कधी ज्योत बनून उजळणं
आणि अंधाराला उजळवून टाकणं
कधी चिता बनून धडधडणं
आणि अंधारातच हरवून जाणं...


- जान्हवी मुळे

.................................................................................................................
© All Rights to this and all poems published in this Blog are reserved. Reproduction of any kind without prior permission of the Wirter is not allowed.