शुक्रवार, ८ सप्टेंबर, २००६

माझ्या स्वप्नातलं एक गाव

माझ्या स्वप्नात एक गाव आहे
सर्वांना असतं, तसंच त्यालाही एक नाव आहे

माझ्या स्वप्नातल्या गावाला -
डोंगराची कास आहे
सागराची आस आहे
किना-यावरच्या वाळूला झाडो-याची वेस आहे...

माझ्या स्वप्नातल्या गावात
पाखरांना कंठ फुटतो
वेळूच्या बेटांमधून वारा शीळ घालतो
गोड आर्त गळ्यातून ओथंबलेला सूर सांडतो
आणि काळ्याकुट्ट दगडालाही
पांढराशुभ्र पाझर फुटतो...

माझ्या स्वप्नातील गावाने
सर्व नाती जपली आहेत
जुन्या- नव्यांनी सोबतीनं
रानगीते गायली आहेत
गर्द रात्रीच्या अंधारात
गुलाबी स्वप्ने पाहिली आहेत...

त्या गावाला -
रोजचा सूर्य नवा असतो
रात्रीचा चंद्रही गोड गोड हसतो
अन्नदाता आनंदानं
काळी माय पिकवंत असतो...

त्या गावात-
तुम्हाला कदाचित कोणी ओळखत नसेल
पण तुमच्या स्वागताला
प्रत्येकजण तयार असेल

माझ्या स्वप्नातल्या त्या गावात
आपण सगळेच जाऊन आलोय.
तुम्हाला पत्ता हवाय? माफ करा,
तो मात्र आपण विसरून गेलोय...
तुम्हाला आठवला, तर मला सांगायला विसरू नका....

जान्हवी मुळे

...................................................................................................................................
© All Rights to this and all poems published in this Blog are reserved. Reproduction of any kind without prior permission of the Wirter is not allowed.

गुरुवार, ७ सप्टेंबर, २००६

घरटं

पाखरं येतात, जागा शोधतात
काट्या-कुट्या जमा करतात
वळचणीला इवलंस घरटं उभं राहतं...

नवी पिढी जन्म घेते,
हसते, खेळते, बागडते
घरट्याचं मन कृतार्थ होतं.

पंखात बळ येतं तेव्हा
पाखरं उडून जातात,
उध्वस्त होऊन वळचणीला
'घरटं' मात्र शिल्लक राहतं.

मुक्या मनात उमणारे
पण कुणालाच न कळणारे
निःशब्द भाव एकटंच बोलंत राहतं...

पाखरांच्या आठवणी आल्या
की अदृष्य टीपे गाळत राहतं
काट्याकुट्यांच्या संसारात नसलेलं अस्तित्त्व
तेही शेवटी हरवून दातं...

जान्हवी मुळे.

...................................................................................................................................
© All Rights to this and all poems published in this Blog are reserved. Reproduction of any kind without prior permission of the Wirter is not allowed.