बुधवार, २६ जानेवारी, २०११

ट्रेन

तुझी गाडी आली, आणि तू निघून गेलास

नजरेपुढून सरकत्या दरवजांकडे मी पाहात राहिले

माझ्याही नकळत स्वतःला पुन्हा

तुझ्यात हरवत गेले.

रस्त्यावरच्या गर्दीची अचानक जाणीव झाली

ओळखीची वाटणारी माणसंही मला

अचानक परकी झाली

तू आहेस म्हणायचं, तर तू कुठेच दिसत नाहीस

तू नाहीस म्हणायचं, तर तुझ्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही

खांद्यावरच्या ओझ्याची जाणीव झाली,

तेव्हा हळूच मागे झाले.

गर्दी येत गेली, ट्रेनमागून ट्रेन भरत गेली

माणसं सगळी पळत राहिली

कसल्याशा अनाम ओढीनं...

मी मात्र तिथेच थांबले

माझी गाडी सुटण्याची वाट पाहात...

आणि जाणीव झाली, एका दाहक वेदनेची

भरल्या प्लॅटफॉर्मवर एकाकी कोपऱ्याची...

माझ्यासाठी आता तू

मधल्या स्टेशनवर उतरू शकणार नाहीस.

तुझं-माझं स्टेशनही एक असणार नाही.

मग आपली भेट केव्हा? टर्मिनसवर कधी भेटू तेव्हा?

एकाच रस्त्यावरून जाऊ आपण,

पण एकत्र प्रवासाचं सुख नाही.

तुझा ट्रॅक वेगळा, माझाही वेगळा.

बस, काही क्षणांचा प्रवास एकत्र घडला...

- जान्हवी मुळे