शुक्रवार, ७ सप्टेंबर, २००७

कविता

कविता एक धग आहे
गोठलेल्या पहाडातली
कविता एक आग आहे
पेटलेल्या समाजातली

कविता एक शक्ती आहे
कोंडलेल्या श्वासातली
कविता एक भक्ती आहे
हात जोडलेल्या मनातली

कविता एक वाट आहे
धुक्यामध्ये हरवलेली
कविता एक वाट आहे
प्रकाशानं भरलेली

कविता एक ज्योत आहे
देवघरात तेवणारी
कविता एक ज्वाला आहे
चिता भडकवणारी

कविता एक भावना आहे
रक्तातून पाझरणारी
कविता एक प्रेरणा आहे
काट्यांमधनं चालणारी

कविता एक कला आहे
अखंड वाहणारी सरीता आहे
कविता एक कला आहे
खरतर, कलाच एक कविता आहे...

- जान्हवी मुळे

...................................................................................................................................

© All Rights to this and all poems published in this Blog are reserved. Reproduction of any kind without prior permission of the Wirter is not allowed.


प्रत्येकाच्या मनातील कवी...

प्रत्येकाच्याच मनात
एक कवी दडला असतो
वेळ काळ बघून तो अवचित वर येचो...

आईच्या ओव्यांतून, गाईच्या हंबरण्यातून
वासरांच्या ओरडण्यातून आणि बाळाच्या रडण्यातून
सारखाच सूर टिपत असतो...
प्रत्येकाच्या मनातून एक कवी गात असतो...

साधे झ-यांचे वाहणे..
कुणा वाटे हसणे, कुणा केविलवाणे रडणे
प्रत्येकजण आहे भावनांच्या हातचे खेळणे...
त्याच तालासूरांवर प्रत्येकजण जगत असतो,
प्रत्येकाच्याच मनातून एक कवी हसत असतो...

कवी...
एक रचनाकार...
स्वर-तालांचा, रंगरेखांचा,
इतिहासाचा आणि समाजाचा...

कवी...
एक कवडसा...
प्रत्येकाचं मन उजळवणारा...

कवी...
एक दलाल...
आपल्या भावना आपल्यालाच विकणारा,
बहुतेकदा शब्दांवाचूनच बोलणारा,
प्रत्येकाच्या मनाशी सौदा करणारा...

प्रत्येकाच्याच मनात एक हुंदका दडलेला असतो,
हळूवार क्षणी तो तरंगत वर येतो,
शब्दांचं शेवाळ लेवतो,
आणि कवितेचा जन्म होतो...

मित्रहो !
कविता म्हणजे नसे नुसते शब्दांचे बांडगूळ
किंवा नुसताच शब्दांचा खेळ,
त्या शब्दांचा कुठेतरी, कधीतरी,
जुळावा लागतो मनाशी मेळ...

म्हणूनच तर प्रत्येकजण
शब्दांवाचूनच गाणं पसंत करतो
आणि प्रत्येकाच्या मनातील कवी
रसिक म्हणूनही दाद देतो....

- जान्हवी मुळे

...................................................................................................................................
© All Rights to this and all poems published in this Blog are reserved. Reproduction of any kind without prior permission of the Wirter is not allowed.