शनिवार, २८ फेब्रुवारी, २००९

चेह-यावर कसलेसे मुखवटे चढवून
माणसं इथं जगत राहतात
किंवा जगण्याचं नाटक करतात

आणि मुखवटे गळून पडतात,
तेव्हा चेहरेच हरवून जातात

कॅमे-याच्या पुढ्यात
फ्लॅश-लाईट्सच्या झगमगाटात
मनाचे अंधारलेले कोपरेही
सहज दडून राहतात...

माथ्यावर जखमा झेलणारे अश्वत्थामे
हसत हसत अमरत्वाचा शाप भोगतात

-जान्हवी

...................................................................................................................................

© All Rights to this and all poems published in this Blog are reserved. Reproduction of any kind without prior permission of the Wirter is not allowed.

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २००९

गंगा

वाहणारी मी नदी,
सागराचा शोध आहे
दोन्ही किनारे सोडून आले
उफळलेला क्रोध आहे

स्वर्गलोकी घर होते,
पृथ्वीवरती येणे झाले,
पर्वताच्या छायेमध्ये
स्वच्छंदी जीणे झाले

ओघ माझा पेलणारा
तो सदाशिव एकच होता
आसक्त तरीही विरक्त असा
बैरागी तो एकच होता...

जटाभारी परी त्याच्या पडता
श्वास माझे अडकून गेले,
स्वत्वाचे संकेत सारे
अलगद अन मोडून गेले

होऊनही तयाची मग
त्याची न मी राहिले
वाहण्याची नियती माझी,
माझी न मी राहिले

भगीरथाने इथे आणिले
मला जगाच्या उद्धाराला
अभिमान तो गळून पडता
गंगेचा उद्धार झाला...

- जान्हवी