रविवार, २६ ऑक्टोबर, २००८

एका शहराची न संपणारी कहाणी

या शहराच्या गल्लीबोळांत,
चकाकत्या उंच महलांत,
तुमच्या आमच्या घरात आणि रस्त्या रस्यांवर
इतिहास गोठून राहिलाय...
भविष्याची चिंता वाटतेय ?
अहो, इथला वर्तमानच काळवंडलाय...

इथं आहे काळं पाणी आणि काळंच आकाश...
काळ्या जगात घुसमटणारा कोवळा श्वास
थकलेल्या बिछान्यात गुदमरणारा मखमली निश्वास...
अंधारल्या घरट्यांना जागवणारा सोनकीरणांचा भास...

प्रेम आणि मैत्रीतूनही इथं घरं पेटतात,
दुकानं जळतात, दंगली उसळतात,
अन् भीतीच्या वावटळी उठतात.
पण...
बॉम्बस्फोट, पूर, वादळ आलं की माणसं जवळ येतात...

इथला माणूस साधा सरळ
ना कुणाच्या अध्यात ना मध्यात
सदैव हरवलेला आपल्याच व्यापात...
पण इथलं जगणं मोरपंखी
आणि इथली स्वप्न फुलपंखी
म्हणूनच की काय,
एका कोषात गुरफटल्यावरही
उड्या मारणारे इथे बरेच असतात...

इथं विरोधाभासांची कधीच कमी नसते
श्रीमंतीच्या शेजारी गरिबीही हसत हसत नांदते...

आता बरंच काही बदलून गेलंय
तरीही सगळं तसंच आहे...
काळ बदलून गेलाय, पण धुराचं राज्य टिकून आहे...
गिरण्यांच्या चिमण्या कधीच थंड झाल्यायत
पण ओस पडलेल्या आवारात
आजही आग धुमसतेय...
विखुरलेली स्वप्नं पायदळी तुडवत
मोटारी आजही सर्रकन निघून जातायत
आणि आशाळभूत बालपण
कोमेजून पाठीमागे धावतंय...

असं असलं तरीही,
इथला माणूस आजही तसाच आहे...
पडद्यावर आणि वास्तवातही
स्वप्नांचा त्याचा शोध अजूनही सुरूच आहे..

इथं प्रत्येकाच्या डोळ्यात
थोडी निराशा, अन् थोडी बेफिकीरी...
थोडी आशा, अन् थोडी कर्तबगारी...
थोडी जिद्द अन् थोडी कारागिरी...
थोडी सच्चाई अन् थोडीशी हेराफेरी...
या सगळ्यांना स्वप्नांची झणझणीत फोडणी...

उठणं, कामावर जाणं, फिरणं
खाणं, पिणं, झोपणं,
कधी सिनेमा, कधी क्रिकेट,
कधी वडापाव, कधी भेळ
आणि चौपाटीवर वा-याची गाणी
अशीच काहीशी इथल्या माणसाची कहाणी...

इथला माणूस असाच जगतो,
कठोर म्हणता म्हणता हळवा होऊन जातो,
स्वतःच्याच शोधात धाव धाव धावतो
कधी थकलाच तर,
मंदीर, मस्जिद, चर्चमध्ये माथा टेकतो
इथला माणूस असाच वागतो...

घड्याळाचा गजर होतो, चहाचा गंध दरळवतो
लोकलचा हॉर्न वाजतो,
गार पडलेल्या रस्त्याचा श्वास
पुन्हा पायदळी तुडवला जातो,
मुक्या टीव्ही- रेडियोला कंठ फुटतो,
इथला सूर्य असाच उगवतो...

इथं कधीच रात्र होत नाही
कारण दिवस संपला तरी काम संपत नाही
काम नसलं तर पोट भरत नाही
उपाशी पोटी झोप लागत नाही
इथली रात्र कधीच संपत नाही...
इथली स्वप्नं कधीच मरत नाहीत...

स्वप्नांच्या मागे धावणं कोणीच थांबवत नाही
म्हणूनच इथलं जगणं कधीच थांबत नाही...

पण
आता भीतीही वाटतेय...
घड्याळाबरोबर पळता पळता
ही नगरी थकून तर जाणार नाही ?
वाढत्या गर्दीच्या व्यापात
स्वतःला हरवून तर बसणार नाही ?

म्हणूनच जरा जपून
कारण आपल्या वाढत्या उच्छ्वासांनीच
शहराचा जीव गुदमरतोय...

- जान्हवी मुळे, स्टार माझा

...................................................................................................................................
© All Rights to this and all poems published in this Blog are reserved. Reproduction of any kind without prior permission of the Wirter is not allowed.