बुधवार, १५ एप्रिल, २००९

कृष्णविवर

जेव्हा एखाद्या ता-याचा स्फोटात अंत होतो,
आणि आकाशातल्या रांगोळीतून
एक ठिपका हरवून जातो,

सगळंच काही संपत नाही...

प्रकाश लोपला तरीही, पदार्थ संपत नाही,
रिकामीशी वाटली तरी, पोकळी रिती रहात नाही...

मृत ता-याचंही एखादं कृष्णविवर बनतं
आणि आपल्याच आसपासच्या ग्रहगोलांना
आपल्यातच ओढत राहतं...

आयुष्याचंही काहीसं असंच असतं
मागे राहिलेलं, उणं-पुरं
मनाला आत, आत खेचत राहतं...

त्या गर्द अंधारात म्हणे,
सारं काही हरवून जातं,
पण मला वाटतं, तिथे
आयुष्य पुन्हा नव्यानं जन्म घेतं...
- जान्हवी

...................................................................................................................................
© All Rights to this and all poems published in this Blog are reserved. Reproduction of any kind without prior permission of the Wirter is not allowed.

2 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

विचार करण्यासारखी आहे ही कविता..

Paresh Mhetre म्हणाले...

अप्रतिम..